राज्यातील दिवसागणित वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. अशीच एक घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कन्हन येथील जवाहरलाल नेहरु रुग्णालयात घडली. कोरोना बाधित चार रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. त्यानंतर एका रुग्णाच्या नातेवाईकाने रुग्णालयाबाहेर तोडफोड केली. (Coronavirus Vaccine: नागपूर येथे लसीकरण केंद्राबाहेर डोस संपल्याचे बोर्ड, नागरिकांकडून संताप व्यक्त)
वेस्टर्न कोल फिल्ड्स कंपनीच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात कोरोना बाधितांसाठी उपचार व्यवस्था नुकतीच सुरु करण्यात आली होती. ही सुधिवा राज्याच्या आरोग्य विभागाकडून उपचार सेवा दिली जात होती. परंतु, सोमवारी रात्री या रुग्णालयात 30 व 57 वर्षीय दोन पुरुषांचा आणि 47 वर्षीय दोन महिलांचा मृत्यू झाला.
हे समजात एका महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात तोडफोड केली. तसंच ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील केला. मृत महिलेच्या पतीने रुग्णालयाबाहेरील काच, व्हिल चेअर आणि इतर साहित्याची तोडफोड केली. ऑक्सिजनचा पुरवठा नीट न झाल्याने मृत्यू झाल्याचे पतीचे म्हणणे आहे.
दरम्यान, जवाहरलाल नेहरू रुग्णालय प्रशासनाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच मृत पावलेले रुग्ण रुग्णालयात दाखल होताच त्यांची अवस्था गंभीर होती. त्यांच्यावर योग्य उपचारांसह ऑक्सिजनचा पुरवठाही व्यवस्थित करण्यात आला. मात्र तरीही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने तोडफोड करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहे.