COVID 19: नागपूर येथे अमेरिकेहून आलेल्या 45 वर्षीय व्यक्तीची Coronavirus चाचणी पॉझिटीव्ह
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

नागपूर (Nagpur) येथील एका 45 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी (Coronavirus) पॉझिटिव्ह आली आहे. हा व्यक्ती अमेरिकेहून नागपूर येथे आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र एच ठाकरे (Ravindra H Thakare) यांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. कोरोना पीडित व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय यांची सुरक्षीतता आणि सामाजिक प्रतिमा ध्यानात घेऊन या व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोणा व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. यातील पाच जण हे पुणे तर दोघे हे मुंबई शहरातील आहेत. उर्वरीत तिघांबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. तसेच, नागपूरमध्ये आढळलेला व्यक्ती हा या दहापैकीच एक आहे की वेगळा याबाबतही माहिती मिळू शकली नाही.

कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवताना नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, आवश्यक ती काळजी जरुर घेतली पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यासोबतच काही लोकांकडून शाळा,  महाविद्यालयांना सुट्टी देणार का असे विचारले जात आहे. परंतू, लगेचच शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात येणार नाही. दोन दिवस परिस्थितीचा अंदाज घेतला जाईल. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला जाईल. त्यातूनही गरज भासली तर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (हेही वाचा, Coronavirus: COVID-19 विषाणू म्हणजे साथीचा आजार- जागतिक आरोग्य संघटना)

एएनआय ट्विट

दरम्यान, राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व सविधा आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आवश्यकता भासली तर, खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना व्हायरस बाधिक व्यक्तिंना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.