Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

नागपूर (Nagpur Crime) येथे एका दाम्पत्याने आपल्या 12 वर्षीय मुलीवर विषप्रयोग केला आणि त्यानंतर स्वत:ही आत्महत्या (Suicide) केली. या घटनेत दाम्पत्याचा मृत्यू झाला असून मुलगी मात्र वाचली आहे. तिच्यावर शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय (मेयो) येथे उपचार सुरु आहेत. ही घटना शहरातील जरीपटका पोलीस ठाणे (Jaripatka Police Station) हद्दीतील विजयश्री नगर येथे घडली. प्राप्त माहितीनुसार, या दाम्पत्यापैकी महिलेला कर्करोग (Cancer Symptoms) झाला होता. त्यावरील उपचारासाठी पैसे नसल्याने दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. सदर दाम्पत्य हे मुळचे केरळ (Kerala) येथील असून वैद्यकीय उपचारांसाठी नागपूर येथे आल्याची प्राथमिक माहिती आहे.

वैद्यकीय उपचारांवरील खर्चामुळे कर्जाचा डोंगर

नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रीजु विजयन उर्फ विजय नायर (45) आणि प्रिया रीजु नायर (34) हे केरळ राज्यातील जोडपे आपल्या 12 वर्षांच्या मुलीसह नागपूर येथे आले होते. प्रिया रीजु नायर यांना कॅन्सर झाला होता. त्यावरील कॅन्सरवरील उपचार घेण्यासाठी ते केरळ आणि इतरही विविध ठिकाणी फिरत होते. मात्र, अनेक ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडत नसल्याने अखेर ते नागपूर शहरात आले. त्यांच्या सोबत 12 वर्षांची वैष्णवीदेखील होती. डॉक्टरांनी पती रीजु उर्फ विजय नायर यांना पत्नीवरील वैद्यकीय उपचारांसाठी सांगितलेला खर्चही प्रचंड होता. धक्कादायक म्हणजे एका आठवड्यात होणारा खर्च सुद्धा त्यांच्या आवाक्याबाहेर होता. परिणामी, हा खर्च पेलायचा कसा हा प्रश्न त्यांच्या समोर होता. इतकेच नव्हे तर पत्नीवरील वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगरही साचला होता. परिणामी त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, Obesity and Cancer: कर्करोगाची जवळजवळ 40% प्रकरणे लठ्ठपणाशी निगडीत; अभ्यासात धक्कादायक खुलासा)

आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्येचा निर्णय

रीजु नायर यांनी आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पत्नी आणि मुलीला शीतपेयातून विष दिले आणि नंतर ते स्वत:ही प्राशन केले. दरम्यान, शीतपेयातील विषामुले मुलगी वैष्णवी हीस जोरदार उलट्या झाल्या. त्यामुळे पोटातील विष बाहेर पडले आणि त्याची तीव्रता कमी झाली. परिणामी तिचे प्राण वाचू शकले. पण, पती आणि पत्नी अनुक्रमे रीजु आणि प्रिया यांच्या शरीरात मात्र ते विष भिनत गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, वैष्णवी हिस नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Robot 'Commits Suicide': जगात पहिल्यांदाच दक्षिण कोरियामध्ये चक्क एका रोबोटने केली आत्महत्या; कामाच्या ताणाने त्रस्त असल्याचा दावा)

घटनेचा माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावली. दाम्पत्याकडे असलेल्या आधार कार्डवरुन त्यांचा पत्ता आणि इतर तपशील पोलिसांना मिळवता आला. दरम्यान, हे जोडपे मुळचे केरळचे असले तरी ते सध्या कोल्हापूर येथे निवासाला असल्याचे आधारकार्डवरील पत्त्यावरुन पुढे आले. त्यांच्या आधारकार्डवर सध्याचा पत्ता कोल्हापूर येथील असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.