Abu Asim Azmi (फोटो सौजन्य - फेसबुक)

Abu Asim Azmi Reaction On Suspension: मुघल सम्राट औरंगजेब यांच्यावरील वक्तव्यामुळे चालू महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार अबू आझमी (Abu Asim Azmi) यांना निलंबित (Suspension) केल्यानंतर त्यांची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे. अबू आझमी यांनी त्यांचे निलंबन 'मनमानी' असल्याचे म्हटले आहे. तसचे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही सपा आमदाराने केला आहे.

अबू आझमी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'माझे निलंबन ही सरकारची मनमानी कृती आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. महाराष्ट्रात दोन कायदे चालू आहेत. जर महाराष्ट्रात लोकशाही संपली असेल तर सरकार जनतेसोबत आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींसोबत काहीही करू शकते.' याआधी त्यांनी निलंबनावर निराशा व्यक्त केली आहे आणि म्हटले आहे की, 'सभागृहाचे कामकाज चालावे यासाठी मी माझे विधान मागे घेण्याबद्दल बोललो. मी काहीही चुकीचे बोललो नाही. तरीही, वाद सुरू आहे आणि सभागृहाचे कामकाज ठप्प केले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहाचे कामकाज चालावे आणि काही काम व्हावे यासाठी... मी सभागृहात नाही तर विधानसभेच्या बाहेर केलेले विधान मागे घेतले. तरीही, मला निलंबित करण्यात आले आहे.' (हेही वाचा - Abu Azmi Retracts Statement On Aurangzeb: अबु आझमी यांच्याकडून औरंगजेब बद्दल केलेलं वक्तव्य मागे; 'चूकीचा अर्थ लावल्याने गोंधळ' झाल्याचं स्पष्टीकरण (Watch Video))

दरम्यान, अबू आझमी यांना समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचाही पाठिंबा मिळाला आहे. ज्यांनी असा दावा केला की निलंबनामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन झाले आहे. 'जर निलंबनाचा आधार विचारसरणीने प्रभावित होऊ लागला, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अधीनता यात काय फरक राहील? आपले आमदार असोत किंवा खासदार, त्यांचे निर्भय शहाणपण अतुलनीय आहे. जर काही लोकांना वाटत असेल की 'निलंबन' करून त्यांना लगाम घालता येईल, तर हा त्यांच्या नकारात्मक विचारसरणीचा बालिशपणा आहे,' असे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Abu Azmi Aurangzeb Remark: 'औरंगजेब क्रूर नव्हता', अबू आझमी यांचे वक्तव्य; सर्वपक्षीयांकडून संताप, माफीची मागणी, गुन्हा दाखल )

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुघल सम्राट औरंगजेब यांच्यावरील वक्तव्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना बुधवारी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केले. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात सांगितले की, आझमींच्या आक्षेपार्ह विधानामुळे सभागृहाची प्रतिष्ठा दुखावली गेली आहे, ज्यामुळे या अधिवेशनासाठी त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, जो सभापतींनी मंजूर केला.