CM Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

My Family My Responsibility Campaign: कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज सांगितले. आज वर्षा येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.

दरम्यान, यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत, गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करीत आहोत मात्र,आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपविली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत. आज काही लाख परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात आले आहेत. एकूणच कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. (हेही वाचा - Coronavirus Update In Dharavi: धारावीत आज 23 नवे कोरोना बाधित रुग्ण; एकूण संक्रमितांची संख्या 2,938 वर पोहोचली)

यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल. ही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे, तसे झाले तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकूत, असा विश्वासदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.