महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील मंत्री मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (1 सप्टेंबर) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना राजभवन (Raj Bhavan) येथे भेटणार आहेत. या भेटीत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मार्ग मोकळा होईल अशी चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळाने आठ महिन्यांपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांची शिफारस राज्यपालांकडे केली होती. राज्यपालांनी आपल्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करत त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. या नावांना राज्यपालांनी हिरवा कंदील द्यावा असे स्मरण राज्य सरकारकडून वारंवार केले जात होते. मात्र, राज्यपलांनी त्याला दाद दिली नव्हती. अखेर आजच्या भेटीत त्यावर चर्चा होऊन मार्ग निघण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष महाराष्ट्राने पाठिमागील काही महिन्यांत अनेकदा पाहिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांसोबत होणारी आजची भेट अधिक महत्त्वाची मानली जात आहे. राजभवनाकडून राज्यपालांच्या भेटीसाठी आज सायंकाळी 7.30 वाजताची वेळ देण्यात आली आहे. (हेही वाचा, Shiv Sena Targets Maharashtra Governor: राज्यपाल, आठवा महिना आणि निर्णयाचा पाळणा; शिवसेनेचे बाण)
राज्यपालांच्या भेटीवरुन पाठिमागील आठवड्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप रंगले होते. राज्य सरकारकडून राज्यपालांना वेळ मागितली परंतू, राज्यपालांनी ती दिली नाही, असा सनसनाटी आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यानंतर त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना सचीव मिलिंद नार्वेकर यांनी राजभवनावर उपस्थिती दर्शवली होती. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवाकडून त्यांना 1 सप्टेंबर ही वेळ देण्यात आली.
महाविकासआघाडी सरकारने राज्यपालांकडे शिफारस केलेली नावे खालील प्रमाणे
शिवसेना- उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस- एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे
काँग्रेस- रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध बनकर
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चर्चेचे निमंत्रण दिल्याची माहिती आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यपालांनी हे निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.