Drone | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Powai Police Drone Case: भारत पाकिस्तान सीमा तणाव सुरु असताना आणि दोन्ही देशांकडून परस्परांविरोधात ड्रोनच्या (Mumbai Drone News) माध्यमातून चकमक सुरु असताना मुंबई शहरात धक्कादायक घटना घडली आहे. एका 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफर (Cinematographer Drone) द्वारा आकाशात उडविण्यात आलेले ड्रोन पवई परिसरात रविवारी मध्यरात्री अचानक (Drone Crash Powai) कोसळले. ज्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली. स्थानिक नागरिकांना एक मोठ्ठा आवाज ऐकू आला आणि तत्पूर्वी आकाशात चमकणारे दिवे वेगाने पृथ्वीच्या दिशेने येताना दिसले. त्यामुळे नागरिकांनी तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला. प्राथमिक तपासानुसार, अंकित राजेंद्र ठाकूर नामक व्यक्तीने हे ड्रोन उडविल्याची माहिती आहे. तो त्याच्या सोसायटी कंपाऊंडमध्ये या उपकरणाची चाचणी घेत होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

नातेवाईकाकडून भेट मिळाला ड्रोन

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ हैदराबादचे सिनेमॅटोग्राफर असलेले ठाकूर अलीकडेच मुंबईत आले होते आणि पवईतील तुंगा व्हिलेजमधील सोलारिस येथील स्टँझा लिव्हिंगच्या लेक ब्लूम इमारतीत राहत होते. त्यांनी पोलिसांना सांगितले की, परदेशात सुमारे एक लाख रुपये किमतीस मिळणारा हा ड्रोन त्यास त्याच्या नातेवाईकांनी भेट दिला होता आणि अलीकडेच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती.

रील चित्रीकरणासाठी ड्रोनचा वापर

माध्यमांशी बोलताना ठाकूर म्हणाले, 'मी फक्त बाहेरगावच्या शूटिंग दरम्यान रील चित्रीकरण करण्यासाठी हा ड्रोन वापरतो. खराब झालेल्या पंख्यामुळे तो योग्यरित्या काम करत नव्हते, म्हणून मी ते दुरुस्तीसाठी पाठवले होते. रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास ते परत करण्यात आले आणि मी एका मित्रासह सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये त्याची चाचणी घेण्यासाठी खाली गेलो. दरम्यान, ते खाली कोसळले.

सिनेमॅटोग्राफरला चूक मान्य

ठाकूर यांनी स्पष्ट केले की ड्रोन सुरुवातीला सहजतेने उडाला परंतु सुमारे 60 मीटर उंचीवर पोहोचल्यानंतर त्याचे नियंत्रण सुटले. ते अचानक खाली पडले, ज्यामुळे मोठा आवाज झाला आणि रहिवाशांचे लक्ष वेधले गेले. पोलिस तातडीने पोहोचले, ड्रोन ताब्यात घेतला, मला ताब्यात घेतले आणि पवई पोलिस ठाण्यात घेऊन गेले. परिस्थिती स्पष्ट केल्यानंतर मला नंतर सोडण्यात आले, तरी मला गुन्हेगारासारखे वागवले गेले. योग्य परवानगीशिवाय रात्री उशिरा ड्रोन उडवणे ही चूक होती हे मी मान्य करतो, असे ते म्हणाले.

मिड डे डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, एका पोलिस अधिकाऱ्याने पुष्टी केली की, वाढलेल्या राष्ट्रीय सुरक्षा उपायांनी देशभरात ड्रोनच्या वापरावर कडक निर्बंध घातले आहेत, विशेषतः सीमापार ड्रोन क्रियाकलापांशी संबंधित मागील घटनांनंतर. पाकिस्तानी ड्रोन यापूर्वी भारतीय हद्दीत उडाले आहेत, ज्यामुळे आमच्या सैन्याने कठोर कारवाई केली आहे. कोणताही अनधिकृत ड्रोन उडवणे, विशेषतः रात्री, दहशत निर्माण करू शकते, असे ते म्हणाले.