सोलापूर (Solapur) जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून एका तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. प्रदीप विजय अलाट, असे या तरुणाचे नाव आहे. प्रदीप हा उत्तम फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक होता. प्रेम प्रकरणातून प्रदीपची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सोलापूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड यांच्यासह 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम प्रकरणामुळे प्रदीपला बेदम मारहाण करण्यात आली. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप मृत प्रदीपच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रदीप एक उत्तम फुटबॉलपटू तसेच क्रीडा प्रक्षिशक होता. प्रदीपच्या हत्येमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
प्रदीप सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेसाठी घरातून बाहेर पडला होता. परंतु, संध्याकाळच्या सुमारास जखमी अवस्थेतील प्रदीपला सोलापुरातील मोदी परिसरात गंगामाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच प्रदीपचा मृत्यू झाला होता, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. (हेही वाचा - ठाणे: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप)
दरम्यान, नागेश गायकवाड यांच्या पुतनीसोबत प्रदीपला फिरताना पाहण्यात आलं होतं. हा राग मनात धरून चेतन गायकवाड याच्यासह 5 ते 6 जणांनी प्रदीपची हत्या केली. पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.