साथीच्या आजाराविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारकडून महानगरपालिकांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (Photo Credits: ANI)

रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पैश्यांची परतफेड मिळत नाही. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे प्रचंड आर्थिक अडचणी उद्भवत आहेत. याशिवाय महानगरपालिकांनादेखील साथीच्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी राज्य सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही, असं माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीमधील कोविड -19 हॉस्पिटल, सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आचार्य आदिसागर कोरोना सेंटर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना विषाणूसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन प्रशासकीय सज्जतेबद्दल चर्चा केली. (हेही वाचा - उध्दवा अजब तुझे सरकार! दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता? राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल)

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्य करणं आवश्यक आहे. सरकारने आपली निर्णायक क्षमता दर्शविली पाहिजे, जेणेकरुन प्रशासनही वेगाने कार्य करू शकेल. त्यामुळे लोकांना होणारा त्रास कमी होईल. सध्या सांगली जिल्ह्यातील कोरोना संसर्ग दर 16.5% आणि मृत्यू दर 4.10% आहे. हे दोन्ही उच्च आहेत. रुग्णालयात योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे रुग्णांना बेडसाठी धडपड करावी लागते. जिल्ह्यात आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवणेदेखील गरजेचे आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.