Mumbai's Catchment Area Updates: मुंबईकरांसाठी गूडन्यूज; शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये मागील 6 वर्षातील सर्वाधिक पाणीसाठा
Water supply | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांत जोरदार पाऊस झालेला आहे. हा तुफान पाऊस पाणलोट क्षेत्रातही झाल्याने अनेक तलावं,धरणं भरायला सुरूवात झाली आहे. दरम्यान मुंबईत पाणीपुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रातील (Catchment Area) साठा आता 78.63% आहे. मुंबईला एकूण 7 तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. या सातही जलाशयामध्ये मिळून सध्या 11 लाख 38 हजार दशलक्ष लीटर पाण्याचा साठा झाला आहे. ही मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.

मुंबईकरांचा सारा जून महिना पावसाची वाट पाहण्यात गेला. पण 30 जूनपासून सुरू सारा धुव्वाधार पाऊस पाण्याची चिंता मिटवणारा ठरला आहे. तलावक्षेत्रातील पाणी पातळी अवघ्या 9% वर आल्यानंतर बीएमसीने 10% पाणी कपात जाहीर केली होती पण जसा पाणीसाठा वाढला तशी ती मागेही घेण्यात आली आहे.

मुंबईच्या तलावात सध्या मागील 2 वर्षांच्या तिप्पट पाणीसाठा आहे. हा मागील 6 वर्षांमधील सर्वाधिक पाणीसाठा आहे. मुंबईतील मोडकसागर आणि तानसा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले आहे तर विहार, तुळशी लवकरच भरतील अशी आशा आहे. Mumbai Water Stock : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 13 जुलै पर्यंत 56% पाणीसाठा उपलब्ध .

विहार, तुळशी, मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा या 7 तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यांची एकूण क्षमता साडे चौदा लाख दशलक्ष लीटर आहे. दर दिवशी मुंबईला 3800 दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

मुंबईला मागील काही दिवस सतत कोसळणार्‍या पावसामुळे हाय अलर्ट वर ठेवण्यात आले होते. पण आता पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज आहे.  अधूनमधून सरी बरसत असल्याने वातावरणही अल्हाददायक आहे.