यू ट्यूबवर जितू जान (Jeetu Jaan) या नावाने प्रसिद्ध असलेला यू ट्यूबर जितेंद्र याला अटक करण्यात आली आहे. पत्नी कोमल अग्रवाल हिच्या मृत्यूप्रकरणी भांडुप पोलिसांनी या युट्यूबरला अटक केली आहे. युट्यूबरची पत्नी पंख्याला लटकलेली आढळली होती. त्यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून या प्रकरणाच्या तपास सुरु केला. परंतु नंतर मृतक कोमल अग्रवालच्या कुटुंबीयांनी तिचा नवरा जितेंद्र याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कोमलच्या आईच्या साक्षीनंतर आता जीतूला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोमलच्या कुटुंबीयांनी जीतूवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. कोमलची आई आणि बहीण प्रिया यांनी सांगितले की जीतू रोज कोमलला मारहाण करायचा. कोमलच्या आई आणि बहिणीच्या आरोपानंतर जितेंद्र याच्याविरोधात भादंवि कलम 304, 323, 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस कोमलचे पोस्टमार्टम व शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यानंतरच कोमलने फाशी देऊन आत्महत्या केली की तिचा खून झाला हे कळेल. (हेही वाचा: प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून; मृतदेह घरातच स्वयंपाकगृहात गाडल्याचा धक्कादायक प्रकार)
कोमलची आई व बहिण यांनी असेही सांगितले की, घरातल्या छोट्या छोट्या कामांवरून जितेंद्र कोमलला मारहाण करत असे. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडणेही होत असत. दरम्यान, जितेंद्र हा मुंबईतील यू ट्यूबर असून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जीतू जान म्हणून प्रसिद्ध आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जीतू जानचे 284K हून अधिक फॉलोअर्स आहेत.