मुंबईतील वरळी (Worli) भागात राहणाऱ्या एका 49 वर्षीय टॅक्सी चालक व्यक्तीचा शनिवारी उपचाराच्या अभावी मृत्यू झाल्याचे समजत आहे. सुदर्शन रसाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांना खोकला, उलट्या आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. शुक्रवारी त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना कुटुंबाने त्वरित जवळच्या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) भरती करण्यासाठी नेले मात्र तोपर्यंत त्याची कोरोना चाचणी झाली नसल्याने त्यांनादाखल करून घेण्यास हॉस्पिटल ने नकार दिला. यापाठोपाठ, नायर हॉस्पिटल (Nair), सेंट जॉर्ज हॉस्पिटल (Saint George), के ईएम रुग्णालय , फोर्टचे ईएनटी रुग्णालय, हिंदुजा (Hinduja) आणि नंतर नानावटी (Nanavati) रुग्णालयात सुद्धा वेगवेगळी कारणे देत त्यांना दाखल करून घेतले गेले नाही. परिणामी उपचाराच्या अभावी सुदर्शन यांचा शनिवारी राहत्या घरात मृत्यू झाला. रुग्णालयांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे सुदर्शन यांना प्राण गमवावा लागला त्यामुळे संबंधित रुग्णलयांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रसाळ कुटुंबीयांनी केली आहे. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हानिहाय यादी
प्राप्त माहितीनुसार, वरळी येथील सेंच्युरी परिसरात सुदर्शन रसाळ हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते, त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, तसेच अलीकडे श्वसनाचा आणि खोकल्याचा त्रास सुद्धा जाणवत होता. शुक्रवारी हा त्रास वाढताच त्यांना कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांची चाचणी न करताच कोरोना नसल्याचे सांगून दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यापाठोपाठ नायर रुग्णालयात नेले असता तिथे बेड उपलब्ध नसल्याने तिथेही उपचार होऊ शकले नाहीत, अशा पाठोपाठ आठ रुग्णालयांमध्ये कुठे व्हेंटिलेटर नाही म्ह्णून तर कुठे बेड उपलब्ध नाही सांगत त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला गेला. या दरम्यान काही खाजगी रुग्णालयात सुद्धा विचारणा केली असता कोरोनाच्या भीतीने त्यांनी सुद्धा उपचार करण्यापासून हात वर केले.
दरम्यान, यापूर्वी मालाड मधील एका व्यक्तीच्या बाबत सुद्धा असाच प्रकार घडला होता, तर नागपूर मध्येही एका तरुणावर वेळीच उपचार न केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारांच्या नादात सामान्य रुग्णानाकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह दरम्यान सर्व खाजगी रुग्णालय आणि डॉक्टरांना माणुसकी दाखवून आपापले क्लिनिक नॉन कोविड रुग्णांसाठी सुरु करा अशी सूचना केली आहे.