![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/03/honour-killing-784x441-380x214.jpg)
जुन्या प्रेमसंबंधातून एका तरूणाने विवाहित महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) केईएम (KEM Hospital) रुग्णालयाच्या परिसरात रविवारी (14 फेब्रुवारी) दुपारी घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती होताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याप्रकरणी संबंधित तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
राजेश काळे (वय, 37) असे आरोपीचे नाव आहे. तर, पीडित महिला सरकारी रुग्णालयात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिलेत जुने प्रेमसंबंध होते. परंतु, पीडिताने काही दिवसांपूर्वी आरोपीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडून टाकले. याच मुद्द्यावरून आरोपी आणि पीडितामध्ये रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बाचाबाची झाली. यावर संतापलेल्या आरोपीने पीडित महिलेला काही कळायच्याआधीच त्याच्याजवळ असलेला चाकू काढून तिच्या पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी झाली असून आरोपीच्याही पायाला दुखापत झाल्याचे कळत आहे. या दोघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात इंडिया टूडेने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- पुणे: राजगडाच्या बुरुजावर पडलेल्या चार्जर काढण्याच्या प्रयत्नात तरुणाचा दरीत पडून मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील आरोपी राजेश काळे याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील पीडित महिला गोवंडीची रहिवासी आहे. तर, आरोपी मुंबईतील कुर्ला येथे राहायला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.