Photo Credit ; X

मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस पुन्हा दडी मारून बसला असल्याने दुपारच्या वेळेस उष्णता जाणवत आहे. दरम्यान यंदा मान्सूनचं आगमन महाराष्ट्रामध्ये अपेक्षेच्या आधीच झालं असलं तरीही अद्याप सलग जोरदार पाऊस बरसला नसल्याने मुंबईकरांना जोरदार पावसाची आस लागली आहे. कोकणात सध्या पावसाचे धूमशान सुरू आहे. हवामान विभागाने सध्या मुंबईला यलो अलर्ट दिला असून येत्या काही दिवसात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. अधून मधून जोरदार सरी बरसू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वार्‍याचा वेग देखील मंदावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई मध्ये तलावांत पाण्याचे साठे देखील तळ गाठत असल्याने लवकरात लवकर पाऊस बरसावा अशी सार्‍यांचीच अपेक्षा आहे. पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढला असल्याने आठवडाभर  मुंबई तसेच राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. Maharashtra Rain Alert: राज्यात अतिवृष्टीचा इशारा; पुणे, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. 

मुंबई मधील उद्याचे हवामान

हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी  पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे