परदेशी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता परदेशी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी लागणारी कागदपत्रं विद्यार्थ्यांना ऑनलाईन सांक्षाकित (attested) करुन दिली जातील आणि विशेष म्हणजे ही कागदपत्रे विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळात आणि अत्यल्प खर्चात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्रास, गैरसोय कमी होणार आहे.
महाविद्यालयीन शैक्षणिक कागदपत्रे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून दिली जातात. ती सांक्षाकित (attested) करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाशी प्रत्यक्ष संपर्क करावा लागतो. त्यानंतर साक्षांकित कागदपत्रे वर्ल्ड एज्युकेशन सिस्टीम आणि कॅनडा इमिग्रेशन सर्व्हिसकडे विद्यार्थीच कुरिअरने पाठवतात. या संपूर्ण प्रक्रियेसाठी बराच वेळ लागत असून त्यासाठी दोन-अडीच हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलल्या 75 परीक्षा; 27 परीक्षांच्या वेळपत्रकात बदल)
नवीन निर्णयातील लाभ:
# 3-4 दिवसांत कागदपत्रं ऑनलाईन सांक्षाकित करुन मिळतील.
# पुढील प्रक्रियाही मुंबई विद्यापीठामार्फत केली जाईल.
# त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून परदेशात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल.
# या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या संकेत स्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन दिली जाईल.
शैक्षणिक कागदपत्रे सांक्षाकित करण्यासाठी विद्यापीठाकडे वर्षाला सुमारे 15 हजार विद्यार्थींचे अर्ज येतात. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.