मुंबई विद्यापीठाच्या 'आयडॉल'मध्ये सावळा गोंधळ; FYBA च्या तब्बल 236 विद्यार्थ्यांना परीक्षेत भोपळा
Mumbai University (Photo Credits- Facebook)

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) आयडॉलचा (Idol) प्रथम वर्ष बीए (FYBA) चा निकाल नुकताच जाहीर झाला. यात तब्बल 236 विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्टुडंट लॉ कॉन्सिल आणि इतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. (मुंबई विद्यापीठाने विद्यार्थिनी परिक्षेला हजर असूनही लावली गैरहजेरी)

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, मुंबई विद्यापीठाचे मुक्त शिक्षण विभाग आयडॉलमधून प्रथम वर्ष बीए साठी तब्बल 5090 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 236 विद्यार्थ्यांना परीक्षेत चक्क भोपळा मिळाला आहे. 236 मधील 213 विद्यार्थ्यांना एका विषयात तर 18 विद्यार्थ्यांना दोन विषयात आणि 4 विद्यार्थ्यांना तीन विषयात शून्य गुण देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एका विद्यार्थ्याला चारही विषयात भोपळा फोडता आलेला नाही. (पावसामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या असून लवकरच नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल- उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे)

मात्र विद्यार्थी निकालाबाबत साशंक असतील तर त्यांनी पेपर रिचेकींगसाठी द्यावेत, असे आयडॉलकडून सांगण्यात येत आहे. आयडॉलला युजीसीची मान्यता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगलीला लागलेले असताना त्यातच असे निकाल लावून विद्यार्थ्यांचा त्रास वाढवला जात आहे, असे स्टुडंट लॉ कॉन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पेपर पुनर्तपासणीचे कोणतेही शुल्क न आकारता विद्यार्थ्यांची ही समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला आहे.