मुंबईतील (Mumbai) छेडा नगर जंक्शन (Chheda Nnagar Junction) जवळ चार तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर येत आहे. रिक्षेतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करत असल्याने वाहतूक पोलिसाने कारवाई केल्याने चार तृतीयपंथीयांनी पोलिसांनावर हात उचलला. या प्रकरणी पोलिसांनी चारही तृतीपंथीयांना अटक केली आहे. लव्हली पाटील (27), विकी कांबळे (26), तनू ठाकूर (24) आणि जेबा शेख (24) अशी अटक केलेल्या चारही तृतीयपंथीयांची नावे असून ते घाटकोपर मधील पंचशीलनगर येथील रहिवासी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, विनोद सोनावणे (38) असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसांचे नाव असून ते विक्रोळी येथील शाखेत कार्यरत आहेत. सोनावणे ड्युटीवर असताना एका रिक्षातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेण्यात येत होते. त्यामुळे त्यांनी रिक्षा थांबवली आणि ई-चलनाची प्रक्रिया सुरु केली. ते रिक्षाच्या नंबर प्लेटचा फोटो काढत असताना रिक्षातून प्रवास करणारे चार तृतीयपंथी खाली उतरले आणि त्यांनी सोनावणे यांना मारहणा करण्यास सुरुवात केली. ही घटना सायंकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यान घडली. (Pune: वाहतुक पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीत 2 तरुणांकडून पोलिसांवर लोखंडी रॉडने हल्ला)
या तृतीयपंथीयांनी सोनावणे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांचा गणवेशही फाडण्यात आला. त्यांची टोपीही काढून फेकली. तसंच त्यांचा वॉकीटॉकीही फोडला.. दरम्यान, या प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात चारही तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.
वाहतुक पोलिस किंवा पोलिसांवर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील ऑन ड्युटी पोलिसांवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लॉकडाऊन काळात तर या घटना अधिक वाढल्याचे पाहायला मिळाले.