शुक्रवारी (19 मे) एक महत्वाचा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) प्रशासनाची बाजू घेत, मुंबईसाठी 2,100 इलेक्ट्रिक वातानुकूलित बस (Electric Air-Conditioned Buses) खरेदी करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हा ऐतिहासिक निर्णय टाटा मोटर्सच्या मागील आक्षेपांनंतर घेण्यात आला आहे, ज्यामुळे 2,100 सिंगल-डेकर बसेसचा करार थांबला होता. सुप्रीम कोर्टाने केवळ 1400 सिंगल-डेकर बसेसचाच करार कायम ठेवला नाही, तर 700 सिंगल-डेकर बसेसच्या अतिरिक्त मागणीलाही मान्यता दिली आहे.
उल्लेखनीय आहे की, एकूण 2100 बसेसपैकी 20 या आधीच वितरित केल्या गेल्या आहेत आणि त्या सध्या शहरात कार्यरत आहेत. उर्वरित 2080 वातानुकूलित बसेसचे बेस्टच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने एकत्रीकरण केल्याने प्रवाशांना आरामात प्रवास करणे शक्य होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस अंदाजे 700 बसेस सेवेत येण्याची अपेक्षा आहे.
बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या मते, या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत त्यांना अतिरिक्त 2700 वातानुकूलित बसेससह त्यांच्या ताफ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. या बसेसची बोली प्रक्रिया पारदर्शक असून योग्य प्रक्रियेचे पालन करण्यावर त्यांनी भर दिला. सध्या, बेस्ट अंदाजे 3300 बस चालवते, त्यातील 40 टक्के वातानुकूलित आहेत. चंद्रा यांनी पुढे खुलासा केला की, बेस्टने विविध उत्पादकांकडून 19८ डबलडेकर बसेस आणि सुमारे 400 अधिक वातानुकूलित बसेसच्या ऑर्डर दिल्या आहेत, त्या सर्व चालू आर्थिक वर्षात ताफ्यात येतील. (ह वाचा: दुचाकीस्वारांकडून लाच घेणे वाहतूक पोलिसांना पडले महागात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांचे निलंबन)
आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, 2100 इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेसच्या आगमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे संपूर्ण शहरात प्रवासाच्या अनुभवात लक्षणीय सुधारणा होईल. पर्यावरणीय नियमांनुसार जुन्या डिझेल बसेस टप्प्याटप्प्याने बंद केल्या गेल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यातील बसेसच्या या तुटवड्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. मात्र आता नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेसमुळे प्रवाशांच्या बऱ्याच समस्या कमी होणार आहेत.