Shivsena MLA Tukaram Kate (Photo Credits: Facebook)

मुंबईत ठिकठिकाणी सुरु असणाऱ्या मेट्रोच्या (Metro)  कामासाठी रस्त्यात खड्डे व बॅरिकेट्स असे दृश्य पाहायला मिळत आहे. वास्तविक या कामांना शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्यासाठी मोठे प्रयत्नही केले जात आहेत. मात्र तोपर्यंत नागरिकांना या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena MLA) आमदार तुकाराम काते (Tukaram Kate) यांनी मानखुर्द परिसरात नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा निषेध करत ठिय्या आंदोलन केले आहे. विशेष म्हणजे आमदार काते हे आंदोलन चिखलात बसून करत आहेत. निदान आता तरी एमएमआरडीएनं (MMRDA) नागरिकांच्या तक्रारींची तातडीनं दखल घ्यावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत.  मानखुर्द मध्ये सुद्धा आहे  मेट्रोच्या कारशेडचं काम सुरू आहे. या कामामुळे महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी रहिवाशांना मोठी गैरसोय होत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी आमदार काते यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन काते यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी चिखलात बसून ठिय्या दिला आहे. तसेच एमएमआरडीएचे अधिकारी येऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत तोपर्यंत जागेवरून हलणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 च्या मार्गाचे आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल स्टेशनपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण झाले होते. तसेच काही आठवड्यांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिरा रोड, वडाळा- सीएसएमटी, कल्याण-तळोजा या 3 मेट्रो प्रकल्पांना सुद्धा मान्यता देण्यात आली होती. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी मेट्रो पप्रकल्प बराच विश्वसनीय आहे मात्र हे प्रकल्प पूर्णतः सुरु होण्याआधी नागरिकांचा त्रास देखील प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे.