देशभरात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा धोका असताना मुंबईच्या सीरो सर्व्हेमध्ये (Mumbai Sero Survey) एक दिलासादायक बाब समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या एका सीरो सर्वेक्षणात हे उघड झाले आहे की, शहरातील 70 ते 80 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध आवश्यक प्रतिकारशक्ती असू शकते. हे आतापर्यंतचे पाचवे सीरो सर्वेक्षण आहे ज्याबाबतचा निकाल शुक्रवारी प्रसिद्ध केला जाईल. मात्र बीएमसी अधिकाऱ्यांनी लोकांना इशारा दिला आहे की, जर कोरोनाचा नवीन व्हेरिएंट समोर आला तर संसर्ग गंभीर होण्याचा धोका कायम राहील.
त्यामुळे लोकांना कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या सीरो सर्वेक्षणासाठी बीएमसीने 24 वॉर्डमधील 8000 नमुने घेतले होते. यामध्ये लस घेतलेले आणि लस न घेतलेले नागरिकही होते. फक्त लहान मुलांचा यात समावेश नव्हता. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचे नमुने गोळा करण्यात आले होते. ऑगस्टमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात प्रयोगशाळेव्यतिरिक्त घरोघरी जाऊनही नमुनेही गोळा करण्यात आले.
यापूर्वी मे-जूनमध्ये झालेल्या सीरो सर्वेक्षणामध्ये हे उघड झाले होते की, शहरातील 50 टक्के मुलांमध्ये कोरोनाविरूद्ध प्रतिपिंडे सापडली आहेत. यापूर्वी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान बीएमसीच्या प्रयत्नांची केंद्र सरकारने प्रशंसा केली होती. कोरोनाच्या विरोधातील 'मुंबई मॉडेल'चे प्रचंड कौतुक झाले होते. कोरोना विषाणूच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीचे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच दर पाच व्यक्तींमागे चार व्यक्तींच्या शरीरात त्याविरोधातल्या अँटीबॉडीज निर्माण होती. आता मुंबईने हा टप्पा गाठला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील 'या' 8 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका; पॉझिटीव्हीटी रेट राज्याहून अधिक)
दरम्यान, मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 446 रुग्णांची नोंद झाली व 431 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 7,13,605 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 4654 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा दर 1279 दिवस झाला आहे.