Coronavirus outbreak (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरुन आता तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका कायम आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही राज्यांच्या तुलनेत ती अधिक आहे. काल महाराष्ट्रात (Maharashtra) कोविड-19 चे  3,783 नवे रुग्ण समोर आले असून 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत (Mumbai) 515 नव्या रुग्णांसह 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसचे संकट महाराष्ट्रासाठी चिंतेचे कारण बनले आहे. राज्यातील या 8 जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी रेट अधिक आहे. राज्यात साप्ताहिक सकारात्मकता दर 2.63 टक्के इतका आहे. तर पुणे आणि अहमदनगरमध्ये साप्ताहिक सकारात्मकता दर 5 टक्क्यांहून अधिक आहे. सांगली मध्ये 3.88 टक्के तर नाशिक मध्ये 3.76 टक्के आहे. साताऱ्यात 3.56 टक्के, उस्मानाबादमध्ये 3.24 टक्के, पालघरमध्ये 3.13 टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये 3.24 टक्के आहे. त्यामुळे या 8 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे. (COVID-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात NCDC ची महत्त्वपूर्ण माहिती)

राज्यात 49,034 इतके सक्रीय रुग्ण असून त्यापैकी 13,258 रुग्ण केवळ पुण्यात आहेत.   त्यानंतर ठाण्यात 7,249 आणि अहमदनगरमध्ये 6586 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 1,38,277 लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर मृत्यूचे प्रमाणही पुण्यात अधिक आहे. पुण्यात 19,361 अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत 16,037 आणि ठाण्यात 11,334 मृत्यू झाले आहेत.

राज्यात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोना संकटातच सध्या राज्यभर गणेशोत्सव सुरु आहे. यात संसर्ग अधिक वाढू नये म्हणून राज्य सरकारने विशेष नियम लागू केले असून नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राज्यात दिवसागणित रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.