मुंबई: आजारपणात रेल्वे पोलिसांनी सुट्टी घेतल्यास शासन करणार वेतनकपात, रेल्वे पोलीस आयुक्तांचा लेखी आदेश
Railway Police (Photo Credits: Facebook)

मुंबई लोकल (Mumbai Local) मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या रेल्वे पोलीस फोर्स (RPF) साठी एक महत्वाचा निर्णय अलीकडे घेण्यात आला आहे. रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर (Ravindra Sengavkar) यांच्या एका लेखी आदेशानुसार, यापुढे रेल्वे पोलिसांपैकी कर्मचाऱ्यांनी आजाराचे कारण सांगून सुट्टी घेतल्यास त्यांच्या वेतनात कपात करण्यात येणार असल्याचे समजत आहे. 'आजारपणामुळे सुट्टीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात यावे, तसेच सुट्टी संपवून कामावर पुन्हा रुजू होण्यापूर्वी संबंधित कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आयुक्तालयात उपस्थित राहून परवानगी घेणे अनिवार्य आहे', असे आयुक्तांच्या आदेशात मांडण्यात आले आहे. या निर्णयानंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असून "पोलीस कर्मचारी हा माणूस नाही का? आजारी पडल्यास काम करणे अमानुष नाही का?" असे प्रश्न करण्यात येत आहेत. (मुंबई लोकलमध्ये चढण्यासाठी जेव्हा मुंबईकरांना सुपरमॅन व्हावे लागते, पाहा मजेशीर व्हिडिओ (Watch Video)

प्राप्त माहितीनुसार, अलीकडे रेल्वेच्या सुरक्षेला भेदणारे अनेक प्रसंग वारंवार समोर येत आहेत. कधी चेंगराचेंगरी, कधी चोरी मारी तर कधी महिलांच्या बाबतीत अश्लील वर्तन केले जात असल्याचे अनेक किस्से अगदी ताजे आहेत. याचप्रमाणे अनेक ठिकाणी प्रवाशांकडूनच रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. या सर्व गोष्टींवर रोख लावण्याकरिता रेल्वे पोलीस प्रशासनाने सज्ज राहणे आवश्यक आहे मात्र याउलट सध्या रेल्वे पोलिस दलातील शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशी अनेक पदे रिकामी आहेत. शिवाय अपघात झाल्यास जखमी रुग्णांना रुग्णालयात नेण्यापासून सर्व कामे पोलिसांनाच करावी लागतात.

दरम्यान,  वैद्यकीय सुट्टीचा विनाकारण वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश लगवण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास खरोखरच आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा नाहक फटका बसू शकतो. त्यामुळे पोलिसांकडून या निर्णयाचा कितपत स्वीकार होतोय हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.