महाराष्ट्रासह मुंबई शहरामध्येही आता हळूहळू थंडीची जाणीव होण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईकरांनी काल (19 नोव्हेंबर) या महिन्यातील सर्वात थंड वातावरणाचा अनुभव घेतला आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात मुंबई शहरातील सर्वांत कमी तापमानची नोंद काल सकाळी झाली आहे. सांताक्रूझ येथे किमान तापमान 21.4 अंश सेल्सिअस आहे. कुलाबा येथील पारा 24 अंशांवर असल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या मागील काही दिवसांपासून मुंबई सह उपनगरामधील शहरांमध्ये थंडावा जाणवण्यास सुरूवात झाली आहे.
दरम्यान मागील काही महिन्यापासून महाराष्ट्रात चक्रीवादळाचा तडाखा, ऑक्टोबर हीट यामुळे वैतागलेल्या मुंबईकरांना आता ऋतूबदल जाणवायला लागला आहे. अनेकांनी या आल्हाददायक वातावरणामुळे प्रसन्न आहेत.
महाराष्ट्रामध्ये वातावरणात जाणवतोय थंडावा
महाराष्ट्रात मंगळवारी सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे 12.8अंश सेल्सिअस आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तापमान 15 अंशांच्या खाली उतरल्याचीदेखील नोंद आहे. विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान 14-16अंशांच्या आसपास आहे. हे तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा कमी असल्याची नोंद अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी करण्यात आली आहे. मालेगाव येथे कमाल तापमान काल 3.2 अंशांनी सरासरीहून कमी नोंदवले आहे. मालेगावात 28 तर महाबळेश्वर मध्ये 26.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.