Vikroli Rain | X @Vivek Gupta

मुंबई (Mumbai) मध्ये पहिल्याच मुसळधार पावसात जीवितहानीचं वृत्त समोर आले आहे. काल रात्री झालेल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. अशामध्ये विक्रोळी भागात घराचा भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या Disaster Control कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवार 9 जूनच्या रात्री 11.15 च्या सुमारास एका पाच मजली अंडर कस्ट्रक्शन इमारतीचा काही भाग कोसळून ही दुर्घटना झाली आहे.

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, इमारतीच्या लोखंडी बिम सह एका मजल्यावरील स्लॅब कोसळला आहे. त्यानंतर फायर ब्रिगेडने अर्धवट अवस्थेमध्ये लोंबकळत असलेल्या भागाला हटवण्याचे काम केले आहे. बाप-लेकाला तेथून बाहेर काढण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बचावकार्यासाठी टीम येण्याआधीच राजावाडी रूग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आले मात्र त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान मृतांची नावं नागेश रेड्डी वय वर्ष 38 आणि रोहित रेड्डी वय वर्ष 10 आहे. दरम्यान मातीच्या ढिगार्‍याखाली अन्य कोणी जखमी किंवा मृतावस्थेमध्ये अडकले आहे का? याचा तपास सध्या सुरू आहे.