Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन
Mumbai Rains | (Photo Credits: ANI)

काल रात्री पासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. रेल्वेमार्ग जलमय झाले आहेत. त्यामुळे मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. दरम्यान, आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आणि अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे (Brihanmumbai Municipal Corporation) करण्यात आले आहे.

दरम्यान, रस्तेही जलमय झाल्याने नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. मुंबईत आज सकाळी 8.30 पर्यंत कुलाबा येथे 147.8mm पावसाची नोंद झाली आहे. तर सांताक्रुझ येथे 286.4 mm पावसाची नोंद झाली आहे.

BMC Tweet:

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. मध्य, हार्बर रेल्वेसेवा ठप्प करण्यात आली असून पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा हळूहळू मार्गावर येत आहे. (Mumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत)

दरम्यान, भेंडीबाजार, गोल देऊळ, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, बावला कंपाऊंड, जे जे जंक्शन, हिंदमाता, काळाचौकी, सारथी बार, वरळी सी फेस या भागात देखील पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बीएमसीकडून प्रयत्न सुरु आहेत. सायन रेल्वे स्टेशन तसंच कोविड-19 रुग्णांसाठी असलेल्या नायर हॉस्पिटलमध्येही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा शिरकाव झाला आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्यामुळे नागरीकांनी काळजी घ्यावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.