
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून ऐन दिवाळीच्या सणाला त्याची उपस्थिती कायम राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचा सुरु दिसून येत आहे. तर दिवाळीपर्यंत राज्यात पाऊस पडणार असल्याच्या शक्यतेसह यल्लो अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आणि अरबी समुद्राच्या येथून वेगाने वारे वाहत असल्याने आठवडाभर पाऊस सुरु राहणार आहे. तर रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाल्यामुळे परतीच्या पावसालाही उशीर झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आह. तसेच 28 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस सुरु राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात राज्यातून पाऊस जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र तरीही राज्याच्या विविध ठिकाणी पाऊस सुरुच आहे. त्याचा फटका शेतपिकांवर झाला असून काही ठिकाणी पावसामुळे घरे कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 28 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहिल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.(पुणे शहरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ; रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे ओढे,नदी पात्राच्या पाण्यात वाढ)
तसेच 25 ऑक्टोबर ला कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भातही मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये किरकोळ सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.