Mumbai Local | Representational Image (Photo Credits: IANS)

Mumbai Rain Monsoon and Rail Update:  मुंबईसह डोंबिवली, ठाणे शहरामध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहे. या जोरदार पावसाचा फटका आज ( 17 सप्टेंबर) मध्य रेल्वेला देखील बसला आहे. सकाळपासूनच मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने मुंबईत प्रवास करणार्‍या अनेकांचं वेळापत्रक आज कोलमडलं आहे. ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वे सुमारे 20-30 मिनिटं उशिराने धावत असल्याने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर गर्दी आहे. त्यासोबतच ट्रेनमध्येही गर्दी आहे. आज सकाळपासूनच डोंबिवली शहरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह नजीकच्या परिसरामध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. Maharashtra Monsoon Forecast 2019: 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; तर आज मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता

मागील आठवड्याभरापासून मुंबईमध्ये मध्य रेल्वेची रखडपट्टी सुरू आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी नेत्रावती एक्सप्रेस, विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती तर काही ठिकाणी सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक मंदावल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल झाले होते. यामध्ये आता पुन्हा नव्या आठवड्याच्या दुसर्‍याच दिवशी मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक रेंगाळल्याने सामान्य मुंबईकरांच्या त्रासामध्ये भर पडली आहे.

मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक गाड्या रखडल्या आहेत. त्याचा परिणाम मुंबई लोकलच्या इतर वेळापत्रकावरही झाल्याचं दिसून आलं आहे.