प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons)

काल सुरू झालेल्या पावसाने आज सकाळपासून जोर धरल्याने मुंबईची दाणादाण उडाली आहे. रेल्वे रुळांवर आणि सखल भागांमध्ये पावसाचे पाणी गुडघ्यापर्यंत साचल्याने त्याचा रेल्वे आणि रस्ते वाहतूकीला मोठा फटका बसला. आज सकाळी 11 नंतर हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवाही ठप्प झाली. मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर, कुर्ला, चुनाभट्टी, शीव, माटुंगा आदी परिसरात रेल्वे रुळांवर प्रचंड पाणी साचल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई, ठाणे, कोंकणसह नवी मुंबई (Mumbai) तिल शाळा आणि कॉलेजला सुट्टी आली होती. आता सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस पुन्हा जोर दरण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर खोळंबले असून जागोजागी अडकून पडले आहेत.

आजची स्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने शाळा आणि जुनिअर कॉलेजला उद्या, 5 सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षणमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबाद माहिती दिली. शेलार म्हणाले की, "मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर, उद्या (सप्टेंबर 5) मुंबई, ठाणे आणि कोकण विभागातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे."

मुंबई आणि उपनगरात मंगळवारी रात्रीपासून कोसळत असलेला पावसाचा जोर जरी कमी झाला आहे तरीही या पावसामुळे विस्कळीत झालेली रेल्वे सेवा अद्याप पूर्वपदावर आली नाही. अनेक रस्त्यांवर आणि रेल्वे रुळांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई आणि उपनगराला बुधवारी सकाळपासून पावसानं झोडपून काढलं आहे. येत्या 24 तासांत राज्याच्या 5 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. मुंबई तसंच महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.