मुंबई रेल्वे सुरु करणार विशेष 'बोट पथक', पूर आल्यास नागरिकांची करणार मदत
Representational Image (Photo Credits: IANS)

यंदा मान्सून सीझनमध्ये जुलै महिन्यापासून पावसाचा अभूतपूर्व अंदाज पाहायला मिळाला आहे. या पावसाचा सर्वात मोठा फटका हा रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या (Centarl Railway) वांगणी (Vangani)  स्थानकात महालक्ष्मी एक्स्प्रेस (Mahalaxmi Express) मध्ये अडकलेल्या नागरिकांची घटना पाहता यापुढे अशा पूर परिस्थितीत काय उपाययोजना करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी पश्चिम रेल्वेचे (Western Railway)  महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये प्रवाशांना तातडीने मदत मिळावी, यासाठी अत्याधुनिक बोट (Boat Squad) खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या बोटी पूर परिस्थितीमध्ये नागरिकांची तात्काळ सुटका करण्यासाठी कामी येणार आहेत.

मटाच्या वृत्तानुसार, मध्य रेल्वेने तूर्तास प्रत्येकी 10 जणांची क्षमता असलेल्या 10 बोटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातील प्रत्येक बोटीसाठी साधारण दीड लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.येत्या दोन आठवड्यात या बोटी मध्य रेल्वेच्या आरपीएफ ताफ्यात समावेश होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर पश्चिम रेल्वेने नुकतीच एक बोट खरेदी करून ताफ्यात दाखल केली असून अन्य सात प्रवासी बोटींची ऑर्डर देण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून आता मुंबई रेल्वे पोलिसही ऑनड्युटी 'आठ तास', रेल्वे प्रशासनाचा महत्वपुर्ण निर्णय

दरम्यान,रेल्वे सुरक्षा बलाचे विशेष पथक तयार करून यात आरपीएफच्या पाणबुड्यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. ही बोट अतिशय अत्याधुनिक पद्धतीने तयार केली जाणार असून यामध्ये लाईफ जॅकट सह अत्यावश्यक सुविधांचा समावेश असणार आहे. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी या बोटीसह विशेष पथक देखील नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली आहे.