मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरुन (Mumbai - Pune Expressway) आज (16 ऑक्टोबर) दुपारी 12 ते 1 या काळात वाहतूकीसाठी बंद असणार आहे. दिशादर्शक फलक बसविण्यासाठी हा एक तासाचा ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या मार्गावरुन या निश्चित वेळेत प्रवास करणार असाल तर तुम्हाला पर्यायी वाहतूक मार्गाचा विचार करावा लागणार आहे. ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर आडोशी बोगदाजवळ km 40/100 आणि km 40/900 या ठिकाणी Gantry बसविले जाणार आहेत. त्यासाठी साधारण तासभरासाठी पुण्याच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद असणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही वाहतूक खालापूर टोल नाका येथून थांबविण्यात येणार आहे. शिवाय शोल्डर लेनवरही ही वाहतूक बंद असेल. केवळ खोपोली एक्झिट मार्गे शिग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंट वरुन ही वाहतूक द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहे. पाठिमागील आठवड्यातसुद्धा अशाच प्रकारे दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, हे काम निश्चित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन देण्यात आला.
काय आहे ITMC प्रकल्प?
- ITMC प्रकल्पांतर्गत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्यात येणार आहे. ज्या द्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे केले जाते.
- कोणतेही वाहन महामार्गावर दाखल होताच ITMC सॅटेलाईटद्वारे त्यावर नजर ठेवते. जेणेकरुन अपघाताचे कारण कळू शकते.
- या प्रणालीसाठी ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. त्यामुळे वाहन जोपर्यंत महामार्गावर असेल तोवर त्याच्यावर या प्रणालीची नजर असेल. जर काही अघटीत घटना घडली. तर, तातडीने वैद्यकीय मदत आणि इतरही बऱ्याच सेवा उपलब्ध करुन देता येणार आहेत.
- महत्त्वाचे म्हणजे या प्रणालींतर्गत महामार्गावर सीसीटीव्हीचे जाळे असणार आहे. ज्यामुळे वाहनाची बारीकसारीक माहितीही कळणार आहे. ज्यामुळे लेन कटींग करणाऱ्या वाहनांबद्दलही माहिती मिळणार आहे.
- अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
हा प्रकल्प एकूण 340 कोटी रुपयांचा आहे.
- प्लकल्पातील एकूण निधीपैकी 115 कोटी रुपयांचा निधी उभारणीसाठी तर उर्वरीत निधी 225 कोटी पुढच्या 10 वर्षांमध्ये देखभालीच्या कारणास्तव कंत्राटदाराला दिले जाणार आहेत.
पाठिमागील काही काळामध्ये महामार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने पावले टाकावीत यासाठी मागणी केली जात होती.