Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

मुंबई -पुणे महामार्गावर (Mumbai Pune Expressway) अपघातांचं सत्र आजही सुरू आहे. मागील काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांच्या घटना वाढत आहेत. आज (17 मे) सकाळी रसायनी जवळ एसटी बस आणि कार यांचा भीषण अपघात झाला आहे. कार मध्ये एनसीपीचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) प्रवास करत होते. सुदैवाने त्यांचा या अपघातामधून बचाव झाला आहे यात कुणीही जखमी नाही.

पहाटे 5.30 च्या सुमारास मुंबईकडे संग्राम जगताप बीएमडब्ल्यू ने येत असताना एसटी बस सोबत धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. यात संग्राम यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान अपघाताचं नेमकं कारण समजू शकलेले नाही. सकाळी या अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी पहायला मिळाली होती मात्र नंतर ट्राफिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे. संग्राम जगताप सुरक्षित असून ते मुंबईला पोहचले आहेत.

काही दिवसांपूर्वी बोरघाटात कार आणि ट्रेलरचादेखील अपघात झाला होता त्यावेळी तासनतास वाहतूककोंडी झाली होती. तर खालापूर टोलनाक्याजवळही झालेल्या एका अपघातात कार मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.

सध्या या महामार्गावर दुरूस्तीचे देखील काम सुरू आहे. हे 'मिसिंंग लिंक प्रोजेक्टच' काम आहे. या कामाला पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे