Mumbai Power Cut: आज सोमवार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी मुंबईकर (Mumbai) व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना एका मोठ्या समस्येला समोर जावे लागले. सोमवारी शहरातील वीजपुरवठा (Power Cut) खंडित झाल्याने देशाची आर्थिक राजधानीचा वेग थांबला. कळवा-पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई, मुंबई परिसरातील वीज सध्या गायब आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. आता उर्जामंत्री नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी ही वीज सेवा साधारण तासाभरात पुन्हा पूर्ववत होईल असे सांगितले आहे.
याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात. ‘महापारेषणच्या कळवा-पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज खंडीत झाली. याच्या Cascading Effect मुळे मुंबई व मुंबई उपनगरातील वीज देखील खंडीत झाली आहे. महापारेषण कॅपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. एका तासात वीज पूर्ववत सुरू होईल. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करण्यात येईल.’
Mumbai-Thane-Kalyan power failure is being attended to.
Kalwa- padgha transmissions line got tripped,
hence Thane- Palghar, New Mumbai power is off. Consequently, cascading the power failure to Mumbai-Thane & Mumbai suburban city.
It will be restored in approximately an hour.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 12, 2020
ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबई व उपनगरातील वीज पुरवठा आज सकाळी 10 वाजल्यापासून खंडित झाला आहे. यामुळे कार्यालये तसेच लोकल रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या बरेच लोक घरातून काम करत आहेत, त्यांच्या कामावरही यामुळे मोठा परिणाम झाला आहे. टाटा पॉवरचे म्हणणे आहे की 3 हायड्रो युनिट्स आणि ट्राम्बे युनिटमधून वीजपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिकेचे आयुक्त एस. चहल यांनी मुंबईतील सर्व रुग्णालयांना, आयसीयू आणि इतरत्र वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जनरेटर चालविण्यासाठी किमान 8 तास डिझेल साठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरमधील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे ऑनलाईन परीक्षेमध्ये अडथळा; विद्यार्थ्यांनी केली ट्विटरवर तक्रार)
याबाबत, अदानी इलेक्ट्रिसिटीने ट्वीट करून म्हटले आहे की, “वीज ग्रिड बिघडल्यामुळे मुंबईच्या बर्याच भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. ग्रिड सेफ्टी प्रोटोकॉल अंतर्गत, अदानी पॉवर सिस्टम एईएमएल डहाणू जनरेशनच्या माध्यमातून मुंबईत आपत्कालीन सेवांसाठी 385 मेगावॅट पर्यंत वीज उपलब्ध करुन देत आहे. आमची टीम लवकरात लवकर बाधित भागात वीज पुनर्संचयित करण्यासाठी कार्यरत आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व.’