मुंबईकरांनो नियम तोडू नका! मुंबई पोलिसांकडे कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर्संना सोसायटीमध्ये प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी; पोलिसांचे गृहनिर्माण संस्थांना आवाहन
Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

देशात कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्व डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करत आहेत. परंतु, कोरोना ग्रस्तांना सेवा देणाऱ्यांना डॉक्टर्संना काही सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी मुंबईकरांना नियम तोडू नका, असं आवाहन केलं आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात दिल्लीमध्ये डॉक्टर, नर्स व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना घरे सोडून जावे यासाठी त्यांच्या घरमालकांकडून धमकावले जात असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे अनेक डॉक्टर्संनी निदर्शने केली होती. त्यानंतर सरकारने अशा घरमालकांविरोधात कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं होतं. मात्र, राज्यातदेखील अशा घटना घडत आहेत. त्यामुळे अशा घरमालकांविरोधात किंवा गृहनिर्माण संस्थांविरोधात कारवाई करण्यात येईल, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे. (हेही वाचा - बॉलिवुड अभिनेता वरूण धवन याच्याकडून मुख्यमंत्री निधीस 25 लाखांची मदत; 28 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

कोलकात्यातील एका रुग्णालयात कोरोना संसर्गाने एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर या रुग्णालयात काम करणाऱ्या 15 नर्संना त्यांच्या घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर या नर्संना स्वतःसाठी वेगळे घर शोधावे लागले होते. देशात तसेच राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबईकरांनी नियम मोडल्यास कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं आहे.