भीक (Begging) मागण्यासाठी फुटपाथवरुन अपहरण (Child Kidnaping for Begging) झालेल्या 2 मुलांची मुंबई पोलिसांनी सुटका केली आहे. मुंबईतील फुटपाथवर राहणाऱ्या वर्षा कांबळे या महिलेच्या दोन मुलांचे अज्ञातांनी अपहरण केले होते. याबाबत कांजुरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये (Kanjurmarg Police Station) तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तक्रार दाखल झाल्यापासून पोलीस सातत्याने आरपोपीच्या मागावर होते. अखेर 11 व्या दिवशी आरोपींचा माग लागला. पोलिसांनी पाटलाग करुन दोन्ही मुलांची आरोपींपासून सुटका केली. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याशी संबंधीत असलेली एक महिला फरार आहे.
वर्षा कांबळे ही महिला आपल्या दोन मुलांसोबत कांजूरमार्क पोलीस स्टेशन हद्दीत राहात होती. दोन मुलांपैकी मुलगा पाच वर्षांचा आणि मुलगी एक वर्षांची होती. काही दिवसांपूर्वी पुण्याहून मुंबईला येताना ट्रेनमध्ये काळे अडनावाच्या एका कुटुंबासोबत वर्षा हिचा परिचय झाला होता. परियचातून निर्माण झालेली ओळख दृढ होत गेली. दरम्यान, मुलांचे अपहरण झाल्यानंतर दिलेल्या तक्रारीत वर्षा कांबळे यांनी काळे कुटुंबीयांवर संशय व्यक्त केला होता. (हेही वाचा, Crime: दक्षिण मुंबईतील फूटपाथवरून अर्भकाचे अपहरण केल्याप्रकरणी दोघांना अटक)
तक्रारीत प्राप्त झालेली माहिती आणि संशयाच्या जोरावर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरु केला. पोलिसांनी सलग आकरा दिवस ठाणे, कोल्हापूर, सांगली, नगर, औरंगाबाद अशा विविध शहरांमध्ये आणि ठिकाणी आरोपींचा शोध कायम ठेवला. पोलिसांना काळे कुटुंबीयांवर संशय वाढत होता. अखेर पोलिसांना हे कुटुंब हाताशी लागले. मुख्य आरोपी हर्षद काळे याच्यासोबत ताराबाई काळे चंदू काळे तसेच आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. हर्षद काळे याची बायको पौर्णिमा काळे मात्र पोलिसांच्या हाती लागली नाही. ती सध्या फरार आहे.
दरम्यान, पोलिसांनी दोन चिमुकल्यांची सुटका तर केली. परंतू, आरोपींनी हा गुन्हा का केला. त्यांचा उद्देश काय होता. आरोपींनी हा पहिलाच गुन्हा केला आहे की, यापुढेही त्यांची काही वेगळी योजना होती. आरोपींनी या आधी अशाच प्रकारचे किंवा आणखी काही वेगळे गुन्हे केले आहेत का? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळाली नाहीत. पोलीस आरोपींकडून ही उत्तरे मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.