मुंबई पोलीस (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबई येथील जुहू (Juhu) परिसरात काल पोलिसांनी (Mumbai Police) फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. वाहतुकीला अडथळा होत असल्याने फेरीवाल्यांना हटवण्याचे काम पोलीस करत होते. यावेळी पोलीस आणि फेरीवाले यांमध्ये मारहाण झाल्याची बातमी होती. मात्र फेरीवाल्यांनी आधी पोलिसांवर हात उगारल्याने पोलिसांना आपला खाक्या दाखवावा लागल्याचे समोर येत आहे. पोलीस फेरीवाल्यांना उगाचच त्रास देत आहेत अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मात्र आता फेरीवाल्यांनी आधी सुरुवात केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. हे फेरीवाले ड्रग्स, मुलींची छेड काढणे यासारख्या बेकायदेशीर कामांमध्येही सहभागी असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती.

डीएन नगर पोलीस स्थानकातील काही अधिकारी आणि पालिकेच्या अतिक्रमण विभागातील काही लोक यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई मोहीम हाती घेतली. त्यावेळी फेरीवाल्यांनी पोलिसांची कॉलर पकडली आणि धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चिडलेल्या पोलिसांनी या फेरीवाल्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात काही पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी दिली.

2016 साली वाफा मेडीकल येथे आग लागली होती. त्यावेळी फेरीवाल्यांमुळे रस्ता अरुंद झाला होता, म्हणून अग्निशामक दलाची गाडी वेळेवर पोहचू शकली नाही. मात्र अजूनही या परिसरातील हे चित्र बदलले नाही. दरम्यान या फेरीवाल्यांविरोधात इतरही अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी अतिक्रमण हटवण्याचे काम हाती घेतले. मात्र यामध्ये पोलीसंनाचा मारहाण करण्यात आली.