मुंबईमध्ये (Mumbai) कालपासून प्रशासनाने एक मोठा निर्णय घेत, शहरातील शाळा आणि रेल्वे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांना (Hawkers) पूर्णतः मनाई केली आहे. आता शाळांच्या 100 मीटर आणि रेल्वे स्थानकांच्या 150 मीटरच्या परिसरात फेरीवाले आढळल्यास त्यांच्यावर मुंबई पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रविवारी दुपारी त्यांच्या साप्ताहिक फेसबुक लाईव्ह सत्रादरम्यान ही घोषणा केली.
संजय पांडे म्हणाले की, फेरीवाल्यांसाठी हे निर्बंध आधीच लागू आहेत आणि पोलीस दल आतापासून त्यांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करणार आहे. प्रशासनाचे अनेक नियम आणि न्यायालयाचे निकाल, शाळा आणि मंदिरांच्या 100 मीटरच्या आत तसेच रेल्वे स्थानकांच्या 150 मीटरच्या आत फेरीवाल्यांना तसेच विक्रेत्यांना त्यांचे सामान विकण्यास मनाई करतात. आता इथून पुढे शाळा आणि स्थानकांजवळ फेरीवाले आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
मंदिरांबाबत बोलायचे झाले तर, ट्रस्टना त्यांच्या परिसरातील फेरीवाल्यांबद्दल प्रशासनाकडे तक्रार करावी लागेल, कारण मंदिरांच्या आजूबाजूची बरीच जमीन ट्रस्टच्या स्वतःच्या मालकीची असते आणि धार्मिक विधींशी संबंधित अनेक उत्पादने परिसरात विकली जातात. मात्र, फेरीवाल्यांनाही उपजीविकेचा अधिकार आहे आणि तो त्यांच्यापासून हिरावून घेण्याचा उद्देश नाही, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, ‘काही स्पष्ट नियम आहेत ज्यांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही आणि ते गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा फेरीवाले त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी मला भेटायला येतात. एक नोकरी गमावलेला एमबीए पदवीधर मला भेटायला आला. त्याने अंधेरीमध्ये रस्त्याच्या कडेला एक छोटासा स्टॉल सुरू केला होता. त्याचे रोजचे उत्पन्न 700 रुपये होते पण त्याला दररोज 1250 रुपये दंड भरावा लागला. अधिकृत फेरीवाला म्हणून स्वत:ची नोंदणी करण्यासाठी योग्य यंत्रणा नसल्यामुळेच हे घडत होते.’ (हेही वाचा: Marathi Signboards on Stores: मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मुंबई महापालिका करणार कारवाई)
ते म्हणाले, ‘फेरीवाल्यांचे नियमन आणि नोंदणी करण्यासाठी योग्य अधिकार नसताना, संपूर्ण यंत्रणा गुंडांकडून चालविली जाते जे त्यांच्याकडून खंडणी घेतात. ही एक अतिशय गुंतागुंतीची समस्या आहे. मी बृहन्मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहित आहे आणि त्यांना टाऊन व्हेंडिंग कमिटी स्थापन करण्यास सांगणार आहे जेणेकरून ही समस्या कायमची सोडवली जाईल.’