Job Racket चालवणाऱ्या 3 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक
Arrests | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक नागरिकांकडून लाखो रुपये बळकावून लंपास झालेल्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पर्दाफाश केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार,  आज उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधून या टोळीशी निगडीत असलेल्या 3 जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दक्षिण मुंबईमधील एका रहिवाशाने 1.38 लाख रुपयांना फसवले गेल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नोएडा (Noida) मधून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर छापा टाकत तिघांना अटक केली आहे.

तक्रार दाखल केलेल्या व्यक्तीला बँकेच्या नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. एका मोठ्या जॉब पोर्टलमधून हा फोन आला आहे, असे त्याला भासवले गेले होते. फोन करणाऱ्या टोळीने 1.38 लाख रुपयांचे सर्व्हिस चार्ज भरण्यास सांगितले आणि इतर फी 12 ते 22 एप्रिल दरम्यान भरण्यास सांगितले. पैसे जमा केल्यानंतर या टोळीतील व्यक्तींनी पीडित व्यक्तीचे फोन उचलणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने पोलिसांत धाव घेतली आणि पायधोनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. (Fraud: कंपनीला डेटा एन्ट्रीचे काम करून देतो म्हणत केली 1.27 कोटी रुपयांची फसवणूक, पोलिसांकडून 2 जणांना अटक)

या पीडित व्यक्तीला नोएडाच्या कॉल सेंटरमधून कॉल आल्याचे तपासादरम्यान पोलिसांच्या निर्दशनास आले. या टोळीने विविध राज्यातून अनेक लोकांना अशा प्रकारे लाखो रुपयांचा गंडा घातला होता. लोकांना फसवण्यासाठी या टोळीने एक बोगस जॉब पोर्टल सुरु केले होते. तसंच बँकेतही खोटा ईमेल आयडी दिला होता. ही टोळी पीडितांसोबत मोबाईल फोन किंवा ईमेल द्वारे संवाद साधत असे. अटक झालेल्या आरोपींची नावे कैलाशचंद रामचंद (29), सतिशकुमार कल्याण सिंह (27) आणि गीता तेजवीर सिंह (27) अशी आहेत. या तीघांकडून 3 लॅपटॉप, 14 मोबाईल फोन्स, 8 सिम कार्ड्स आणि 14 बँकेचे बोगस लेटर्स जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर आरोपींना मुंबई आणून कोर्टासमोर सादर करण्यात आले. कोर्टाने या आरोपींना 9 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.