छत्रपती शिवाजी महाराज (Photo Credits: Instagram)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी 2 ते 3 मिनिटांची उद्घोषणा वर्षभरासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.45 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आज या उद्घोषणा प्रणालीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.

मंत्रालय हा प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांच्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी विविध उद्घोषणा सतत होत असतात. मात्र, याच सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन आता दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचार, पराक्रमाची माहिती व्हावी, दररोज मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी–कर्मचारी यांना या शिवरायांच्या विचारातून उर्जा, चैतन्य, स्फूर्ती मिळावी, दिवसाची सुरुवात चैतन्याने व्हावी, अशी सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांची संकल्पना होती. त्यांच्या या संकल्पनेस मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. (हेही वाचा: Bombay High Court कडून रस्त्यांच्या दुरावस्थेची दखल; मुंबई, नवी मुंबई सह 6 पालिका आयुक्तांना समन्स जारी)

काल ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्रालयाच्या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन या शिवविचारांच्या जागरास सुरुवात झाली. दरम्यान, जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे व्हिडिओ लिंकद्वारे एका कार्यक्रमाला संबोधित करताना, एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांचे सरकार आदिवासी आणि कामगार वर्गातील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शासनाने 250 आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट केला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परिक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे.