मुंब्रा: बायकोला WhatsApp वरुन तिहेरी तलाक दिल्याने नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल
(Photo Credits: PTI)

राज्यसभेत मंगळवारी (30 जुलै) तिहेरी तलाक कायदा (Triple-Talaq Bill) बहुमताने पास करण्यात आला. त्यामुळे आता मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीने बायकोला तिहेरी तलाक दिल्यास त्या व्यक्तीला 3 वर्षांची शिक्षा दिली जाणार असल्याचे कायद्याअंतर्गत ठरवण्यात आले आहे. हा कायदा लागू करण्यात आल्यानंतर मुंबईतील (Mumbai) एका महिलेला व्हॉट्सअॅपवरुन (WhatsApp) तलाक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तर पीडित महिलेने नवऱ्याच्या विरोधात मुंब्रा पोलिसात धाव घेतली असून गुन्हा दाखल केला आहे.

इम्तियाज पटेल असे महिलेच्या नवऱ्याचे नाव आहे. पीडित महिलेचा सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ केला जात असे. तसेच महिलेला मारहाण सुद्धा करण्यात आल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. यानंतर पीडितेला व्हॉट्सअॅपवरुन तलाक देत असल्याचे सांगितले.यामुळे महिलेला धक्का बसला असून तिने पोलिसात धाव घेतली.(Triple Talaq Bill: लोकसभा, राज्यसभेनंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून तिहेरी तलाक विधेयकाला हिरवा कंदिल)

या प्रकरणी पीडित महिलेने इम्तियाज, सासू आणि नणंद यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. लोकसभेनंतर राज्यसभेत या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर ते पुढील प्रक्रियेसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे.