प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

पॉर्न व्हिडिओ (Porn Videos) दाखवून आमदार, खासदार आणि पत्रकारांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पर्दाफाश केला आहे. ही टोळी बनावट प्रोफाईल बनवून ओळखीच्या लोकांना लक्ष्य करत होती. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून त्यांच्याशी चांगली ओळख झाल्यानंतर त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राजस्थान, हरियाणा आणि मध्यप्रदेशमधील तीन जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान, महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. याशिवाय, कशाप्रकारे हे गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करायची याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे रॅकेट फेसबूकवर बनावट प्रोफाईल तयार करून ओळखीच्या लोकांना फ्रेन्ड रिक्व्हेस्ट पाठवून त्यांची फसवूक करायचे. संबंधित व्यक्तीने फ्रेन्ड रिक्व्हेस्ट अॅक्सेप्ट केल्यानंतर त्याच्याशी आठवडाभर चॅट केली जात होती. त्यानंतर व्हिडिओ कॉल केला जायचा. व्हिडिओ कॉल सुरु झाला की, त्यांना पॉर्न व्हिडिओ दाखवला जात होता. त्यावेळी लक्ष्य केलेल्या व्यक्तीचे आवभाव रेकॉर्ड केले जात असे. त्यानंतर दोन्ही व्हिडिओ एडिट केले जायचे. या एडिट केलेल्या व्हिडिओच्या बदल्यात त्या व्यक्तीकडे काही पैशांची मागणी केली जाते. अन्यथा सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. हे रॅकेट सुरुवातील कमी रक्कमेची मागणी करायचे. मात्र, आरोपी जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच त्याच्याकडे मोठी रक्कम मागत असे. हे देखील वाचा- मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी! OTT वर Live Porn दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दरम्यान, या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीने आतापर्यंत फेसबूकवर 171 बनावट प्रोफाईल तयार केल्या आहेत. तर, 4 टेलिग्रामवर 4 बनावट चॅनेल तयार केली आहेत. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचे 58 बॅंक अकाऊंट बंद केले आहेत. तर, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेले 54 मोबाईलही जप्त करण्यात आले आहे.