Mumbai Monsoon Updates: मुसळधार पावसामुळे मुंबईकरांनी अतिअत्यावश्यक काराणासाठी घराबाहेर पडा; अन्यथा घरीच थांबण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन
Mumbai Rain | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईसह उपगनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता फक्त अतिअत्यावश्यक असलेल्या कारणासाठीच घराबाहेर पडावे. अन्यथा घरातच थांबण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कारण पावसाचा जोर वाढला असून वेगाने वारा सुद्धा वाहत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या जीव धोक्यात घालू नये. तर भायखळा येथील एका ठिकाणी भले मोठे झाड मुळासकट उन्मळून पडल्याचे दिसून आले आहे.

गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकासह उपविभागातील किनार पट्टीला पुराचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत सेंन्ट्रल वॉटर कमिशन ऑफिशल फ्लड फॉरकास्ट यांनी माहिती दिली आहे. तसेच आयएमडी यांनी फ्लॅश फ्लड (Flash Flood) मार्गदर्शन सुद्धा जाहीर केले आहेत.(Monsoon Updates 2020: गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकसह उपविभागातील किनार पट्टीला पुराचा धोका)

कुलाबा, सांताक्रुझसह दादर मधील हिंदमातासह अन्य ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून आला आहे. त्याचसोबत वेगाने वारा वागत असल्याने मुंबईतील रेस कोर्सच्या जवळ झाड गाड्यांवर पडल्याचे एका व्हिडिओतून समोर आले आहे. यामध्ये गाड्यांचे सुद्धा नुकसान झाले असून आता ते पडलेले झाड बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात सुद्धा विविध ठिकाणी पावसाचा जोर उद्या पर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज IMD यांनी व्यक्त केला आहे. तर महाराष्ट्रासह कर्नाटक किनारपट्टी येथे आज, 8 आणि 9 ऑगस्टला अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचसोबत साऊथ कर्नाटकासह विविध ठिकाणी आणि तमिळनाडू सुद्धा आज, उद्या, 8-9 ऑगस्टला पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे ही आयएमडी यांनी सांगितले आहे.