महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यात आता मुंबईत कोरोना व्हायरससह मलेरियाच्या घटनांमध्ये गेल्या वर्षापेक्षा या वर्षात किरकोळ वाढ झाली आहे. याबाबत मुंबई महापालिकेने माहिती देत असे म्हटले आहे की, जुन महिन्यात मलेरियाची 328 प्रकरणे समोर आली आहे. जी गेल्या वर्षात याच काळात 313 होती. तसेच चार डेंग्यूची प्रकरणे आणि एक लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण जून महिन्यात आढळले आहेत. तर 2019 मध्ये जुन महिन्यातच आठ डेंग्यू आणि पाच लेप्टोस्पायरोसिसरचे रुग्ण आढळून आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
वरळीतील जी साउथ, भायखळातील ई वॉर्ड आणि परेल मधील एफ (साउथ) वॉर्डमध्ये सर्वाधिक मलेरियाचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भागात मोठ्या संख्यने डासांची उत्पत्ती होत असून खासकरुन मिल्स किंवा तुरुंग, चाळ आणि रेल्वेच्या कार शेड येथे आढळून येतात.
महापालिकेच्या साथीरोग विभागाने दादर- माहिम मधील जी नॉर्थ येथे डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसचा संभाव्य धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच माटुंगा मधील एफ नॉर्थ आणि जी साउथ येथे मोठ्या प्रमाणात डेंग्यू आढळून येतात.(मुंबईतील COVID19 च्या रुग्णांचा डबलिंग रेट 50 दिवसांवर पोहचला, महापालिकेची माहिती)
अतिरिक्त महापालिकायुक्त सुरेश काकानी यांनी असे म्हटले आहे की, गेल्या वर्षापेक्षा यंदा मलेरियाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. मलेरियाची उत्पत्ती होण्याचे विविध मार्ग आहेत. परंतु सध्याच्या कोरोनाच्या महासंकटामुळे त्याच्या उत्पत्तीच्या ठिकाणी जाऊन तपासणे हे नागरि अधिकाऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे नागरिकांनीच स्वत:हून याची काळजी घ्यावी असे पुढे त्यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या निर्जंतुकरण विभागाचे कर्मचारी कोविड19 च्या कामात व्यस्त आहेत. त्याचसोबत मान्सूनमधील उद्भवणाऱ्या आजारांकडे सुद्धा टीमकडून लक्ष दिले जात आहे. तसेच या वर्षात अद्याप मलेरियामुळे यंदाच्या वर्षात मृत्यू झालेला नाही.