Mumbai Metro 3 (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRC) मंगळवारी आरे कॉलनीतील सारीपूत नगर येथे कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो लाइन-3 (Mumbai Metro 3) ची चाचणी सुरू केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी 11 वाजता ट्रायल रन म्हणून मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यापूर्वी शिंदे आणि फडणवीस यांनी मेट्रो ट्रेनच्या आत जाऊन त्याचा आढावा घेतला. यावेळी एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे उपस्थित होत्या. मुंबई मेट्रोची तिसरी लेन हा 33.5 किमी लांबीचा भूमिगत मार्ग आहे.

या मार्गावर एकूण 27 स्थानके असतील, त्यापैकी फक्त एकच जमिनीच्या वर असेल, बाकी सर्व स्टेशन जमिनीखाली असतील. या मार्गामुळे दक्षिण मुंबईतील कुलाबा महानगर पश्चिम उपनगरांशी जोडला जाईल. त्यामुळे उपनगरीय लोकल ट्रेन सेवेवरील प्रवाशांचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. या वादग्रस्त मेट्रो ट्रॅकचे वास्तवात रुपांतर करण्याच्या दिशेने ही चाचणी रन महत्त्वाची आहे. या वर्षी 30 जून रोजी शिंदे-फडणवीस सरकारने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या आरे या वनजमिनीवर मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय पलटला होता.

मेट्रो 3 लेनवरील स्थानके-

कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी, धारावी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, विद्याननगरी, सांताक्रूझ, CSIA टर्मिनल 1 (देशांतर्गत विमानतळ), सहार रोड, CSIA टर्मिनल 2 (आंतरराष्ट्रीय विमानतळ), मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ (SEEPZ) आणि आरे कॉलनी. (हेही वाचा: Milk Price Hike: मुंबईमध्ये दुधाच्या दरात तब्बल 7 रुपयांची वाढ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू)

दरम्यान, या प्रकल्पातील पहिली मेट्रो ट्रेन, मेट्रो 3 ची चाचणी यशस्वी झाली आणि मुंबईकरांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. आता या मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुंबईकरांना प्रतीक्षा आहे. मात्र यासाठी मुंबईकरांना डिसेंबर 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तांत्रिक अडचणी, आव्हानात्मक कामे आणि कारशेडचा वाद यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला आहे. एमएमआरसीने आरे कारशेड ते बीकेसी या मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.