प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

मुंबईमध्ये (Mumbai) 1 सप्टेंबरपासून सुटे ताज्या दुधाचे दर (Milk Price) 5 रुपयांनी वाढणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने घाऊक दरात प्रति लिटर 73 रुपयांवरून 78 रुपये अशी वाढ केली आहे. त्यावर दोन रुपये वाहतूक खर्च आकारण्यात येणार आहे. म्हणजेच दुधाचे दर थेट 80 रुपये प्रतिलिटर होतील. किरकोळ बाजारात, सुटे ताजे दुध सर्वसामान्यांना 83 ते 85 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. नवीन दर 1 सप्टेंबर ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.

सुटे ताज्या दुधाचे दर ठरवण्यासाठी मुंबई दूध उत्पादक संघाची पटेल समाज सभागृहात बैठक झाली. बैठकीत तबेला मालकांनी वाढत्या महागाईचे कारण देत दर वाढविण्याची मागणी केली. दुभत्या जनावरांचे खाद्यपदार्थही महाग झाले असल्याचे सांगण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले सी.के. सिंह म्हणाले की, सभेत दुधाच्या दरात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. सर्व सदस्यांनी एकमताने दरात 73 रुपयांवरून 78 रुपये प्रतिलिटर करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय मालवाहतूक (वाहतुकीसह इतर खर्चासह) 2 रुपये लागू होतील. (हेही वाचा: Ganeshotsav 2022: गणेश मंडळांना प्रसाद देताना करावे लागणार 'या' नियमांचे पालन; अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले निर्देश)

जे ब्रॅन्डेड किंवा पॅकेटबंद दूध नसते, ज्याची विक्री सुट्या पद्धतीने केली जाते अशा दुधाच्या किमतीत वाढ होणार आहे. या पद्धतीच्या दुधाची विक्री घरोघरी जाऊन केली जाते. जनावरांच्या चाऱ्याचे भाव वाढले आहेत. हरभऱ्यासारख्या चाऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. हे पाहता दूध उत्पादकांनी सुट्ट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच अमूल मिल्क आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली होती.

दरम्यान, पोहे, चिवडा अशा गोष्टीही दिवाळीपर्यंत महागणार आहेत. पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग, मुरमुर्‍याचे भाव गेल्या तीन महिन्यांपासून वाढले आहेत. किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यांत पोहे आणि मुरमुऱ्याच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे.