मुंबईमधील लोकल (Mumbai Local) ही जनतेसाठी जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. यामध्ये अनेक लोक असेही असतात जे विनातिकीट (Without Ticket) प्रवास करतात. मात्र जर का तुमच्याही डोक्यात विना तिकीट प्रवास करण्याचा विचार आला असेल, तर ही बातमी नक्की वाचा. मुंबईमध्ये विना तिकीट प्रवाशासंदर्भात एका दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे. सत्र न्यायालयाने वैध तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला तब्बल 21 हजाराचा दंड ठोठावला आहे. इतकेच नाही तर, मारहाण झालेल्या रेल्वे तिकीट निरीक्षकाला (TTI) भरपाई म्हणून आरोपीला आणखी 5000 हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
माहितीनुसार, ही घटना फेब्रुवारी 2020 मध्ये घडली जेव्हा 25 वर्षीय आरोपी पनवेल-सीएसएमटी ट्रेनच्या प्रथम श्रेणी डब्यातून वैध तिकीटाशिवाय प्रवास करत होता. तिकीट तपासणीवेळी टीटीआय जोसेफ पीटरप्पा आणि सुनील कुरणे यांनी तरुणाला तिकीट विचारले असता तो वैध तिकीट दाखवू शकला नाही. त्यानंतर त्याला सीवूड्स स्टेशनवर उतरवण्यात आले. ट्रेनमधून उतरल्यानंतर त्याने UTSonmobile अॅपवर तिकिटाचा फोटो दाखवला, जो रेल्वेच्या नियमांनुसार अवैध मानला जातो.
आरोपीने यूटीएस अॅप वापरून मासिक पास खरेदी केला होता, मात्र, अॅप डाऊनलोड केलेला मोबाईल त्यावेळी त्याच्याकडे नव्हता. तरुणाकडे वैध तिकीट नसल्याने चेकर्सनी त्याला दंड भरण्याचा आग्रह धरला. यावरून चिडलेल्या तरुणाने टीटीआय पीटरप्पा यांना मारहाण केली. पीटरप्पा यांनी वाशी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली व त्यावरून तरुणाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे ही बाब न्यायालयापर्यंत गेली. (हेही वाचा: Zero Scrap Mission: भंगार साहित्याची विल्हेवाट लावून मध्य रेल्वेने कमावला तब्बल 45.29 कोटीचा महसूल)
न्यायालयाने म्हटले की, 'विवादाचे एकूण स्वरूप आणि परिणामी गुन्ह्याचा विचार करता, आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा न ठोठावणे हे न्यायाच्या हिताचे असेल. परंतु या प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षा व्हायलाच हवी.' त्यानुसार न्यायालयाने आरोपीला 21,000 हजार रुपयांचा दंड ठोठावला. पुढे कोर्टाने असेही नमूद केले की, तक्रारदाराला 'कथित घटनेतून शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला', त्यामुळे आरोपीने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 357 (1) (b) अंतर्गत पीटरप्पाला 5,000 रुपये भरपाई म्हणून द्यावी. अशा प्रकारे या तरुणाकडे वैध तिकीट नसल्याने त्याला 26,000 रुपयांचा फटका बसला.