मुंबई मध्ये पश्चिम रेल्वेची (Western Railway) वाहतूक विस्कळीत झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान आज (6 ऑक्टोबर) सकाळी नालासोपारा स्थानकामध्ये (Nallasopara Station) ओव्हर हेड वायरमध्ये (Overhead Wire) बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक आज कोलमडलं आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून ओव्हर हेड वायर मधील हा तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हा बिघाडा सकाळी कामावर जाण्याच्या वेळेस झाल्याने अनेकांचा आज खोळंबा होणार आहे. दरम्यान प्रवाशांना पर्यायी वाहतूक सेवेची मदत घेऊन कामावर पोहचण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
दरम्यान हा बिघाड नालासोपारा आणि विरार स्थानकाच्या अप फास्ट लाईन वर झाला आहे. वसई, विरार डाऊन मार्गावर तसेच अन्य 3 लाईनवर रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अप लाईन वरील काम पूर्ण होण्यास 3 तासांचा कालावधी लागू शकतो.
मुंबईमध्ये रेल्वे प्रशासनाकडून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी, बॅंक कर्मचारी, पत्रकार, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी आणि परीक्षांसाठी परीक्षाकेंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थी आणि पालक यांना परवानगी आहे. दरम्यान अनलॉक 5 मध्ये आता मुंबईचा डबेवाला देखील मुंबई लोकलने प्रवास करू शकणार आहे. यासाठी त्यांना क्युआर कोड देण्यात येईल. Mumbai Local Updates: पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून विरार- चर्चगेट- विरार मार्गावर 2 महिला विशेष रेल्वे फेर्या सुरू; इथे पहा वेळापत्रक.
पश्चिम रेल्वेचं अपडेट
#WRUpdates. 06.10.2020. Due to OHE problem on UP fast line between Nallasopara & Virar, trains are being run on UP local line between Virar & Vasai Road
Other three lines are fully operative.Restoration work is in full swing & UP line expected to be restored in 3 hrs. @drmbct
— Western Railway (@WesternRly) October 6, 2020
मुंबई लोकल अद्यापही सामान्य नागरिकांसाठी खुली झालेली नाही. दरम्यान रेल्वे प्रवासामध्येही प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र आता लोकलचं वेळापत्रक कोलमडल्याने पुन्हा लोकलमध्ये गर्दी होण्याची चिन्हं आहेत. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे अनेक लोकल रद्द झाल्यानंतर मुंबईच्या लोकलमध्ये भयाण गर्दीचा एक व्हिडिओ सोशल मीडीयात तुफान व्हायरल झाला होता.