Mumbai Local: माहीम स्थानकात रेल्वेचे चाक रूळावरून सरकल्याने वाहतूक विस्कळीत; अंधेरी-पनवेल-सीएसएमटी रेल्वे सेवा ठप्प
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

माहीम स्थानकाजवळ रेल्वेचे चाक रुळावरून घसरल्याने माहिम स्थानकातील हार्बर मार्गावरील अप-डाऊन अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अंधेरी-सीएसएमटी, अंधेरी-पनवेल ही रेल्वे सेवा पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. आज गांधी जयंतीची सुट्टी असल्याने चाकरमान्यांची गर्दी स्टेशनवर पाहायला मिळत नसली तरीही सुट्टी निमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना खोळंबा झाला आहे. मुंबई-बांद्रे रेल्वेचे चाक सरकल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळालेली नाही.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही प्रवासी जखमी झालेले नाहीत. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीएसएटी-वांद्रे लोकलच्या पहिल्या डब्याचं चाक किंग्स सर्कल आणि माहिम स्थानकादरम्यान असताना रुळावरुन घसरलं. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावरील अंधेरी- सीएसटी, अंधेरी-पनवेल वाहतूक पुढील सुचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

ऐन गर्दीच्या वेळी म्हणजेच सकाळच्या वेळेस माहिम स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याकारणाने माहिम रेल्वे स्थानकातील हार्बर मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची चांगलीच पंचाईत झाली असून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  हेही वाचा- अहमदाबाद: 1 मिनिटांत 426 आरक्षित रेल्वे तिकिटांचे बुकिंग करणारा कोण आहे अवलिया, वाचा सविस्तर

त्या एक दिलासादायक गोष्ट म्हणजे आज नेमकी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी असल्याने चाकरमान्यांची गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली आणि सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. मात्र सुट्टीनिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.