Mumbai Local (Photo Credit - PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक गोष्टींवर गदा आली होती. यामध्ये महत्वाचे म्हणजे सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आली होती. मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली ‘मुंबई लोकल सेवा’ (Mumbai Local) थांबल्याने त्याचा फटका अनेक मुंबईकरांना बसला. त्यानंतर अनलॉक अंतर्गत काही प्रमाणात मेट्रो सेवा व लोकल सेवा सुरु झाली. अजूनही मुंबई लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु नाही, मात्र ती आता सुरु होण्याची शक्यता आहे. सरकार याबाबत विचाराधीन असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह,  यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा: महाराष्ट्र: सलग सुट्ट्या आल्याने कोल्हापूर, शिर्डी, जेजुरी सारख्या देवस्थळांवर भाविकांची अलोट गर्दी)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशा प्रकारे सुरु करता येईल, यादृष्टीने विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे लवकरच मुंबईची लोकल सर्वांसाठी सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेलफेअर असोसिएशनने मुंबई लोकलमध्ये कमीतकमी कमी विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. सध्या मुंबई लोकलमध्ये केवळ निवडक प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, यामध्ये आवश्यक सेवांशी संबंधित लोक आणि स्त्रिया ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात.