कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या अन्यथा तीव्र आंदोलन करु- प्रविण दरेकर
Pravin Darekar (Photo Credits: twitter)

कोविड-19 लसीचे (Covid-19 Vaccines) दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची मुभा द्या अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिला आहे. व्हिडिओ ट्विट करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा प्रविण दरेकर यांनी केली आहे. जर ही परवानगी दिली नाही तर मुंबई भाजप चे अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

व्हिडिओत ते म्हणतात, "कोरोनामुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. त्यामुळे त्यांना कामावर जाणे, व्यवसाय करणे क्रमप्राप्त आहे. अशावेळेला ट्रेन सुरु नसल्यामुळे सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी प्रतीक्षा करावी लागते. प्रवासाचा खर्च परवडत नाही. कसारा-कर्जत आणि वसई-विरार येथून मुंबई येण्यासाठी 700-800 रुपये खर्च आहे. बस, गाड्या पकडण्यासाठी 3-3 तास वेळ व्यतित करावा लागतो. कोरोनामुळे आर्थिक कंबरट मोडलेलं असताना कामावर गेलं नाही तर घर चालणार नाही. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यास हरकत नाही."

प्रविण दरेकर ट्विट:

तसंच सरकारने सहानभुतीने विचार करुन लोकल प्रवासास मुभा देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी सरकारकडे आग्रही मागणी असल्याचेही ते पुढे म्हणाले. (अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर भाजप नेते प्रविण दरेकर, किरीट सोमय्या यांच्या प्रतिक्रीया, Watch Videos)

दरम्यान, लस घेतलेल्यांना निर्बंधात सूट द्यावी, असा नागरिकांचा सूर असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर भाष्य केले आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करायला हवेत. या बाबत दुमत नाही. त्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले. तसंच निर्बंध हे जनतेच्या सुरक्षेसाठी लागू केले असून त्याचा नागरिकांनी गैरअर्थ लावू नये, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.