Mumbai Local | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

वाशी येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईची हार्बर लाईन लोकल सेवा (Mumbai Harbor Line Local Service) विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पनवेल-सीएसएमटी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भल्या सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, सीएसएमटी ते मानखुर्द आणि पनवेल ते वाशी अशी मर्यादित स्वरुपातील सेवा सुरु आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटद्वारे दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर करुन विस्कळीत झालेली रेल्वे सेवा लवकरच पूर्वपदावर आणली जाईल. त्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत.

दरम्यान, ठाणे-वाशी-ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या सकाळी 6.45 पासून पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही सुतार यांनी दिली आहे.

पहाटे पाच ते सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ ही कामावर जाणाऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या काळात लोकल ट्रेनला मोठी गर्दी असते. सहाजिकच लोकलचा या काळात तरी खोळंबा होऊ नये अशी नागरिक आणि प्रवाशांची इच्छा. मात्र, अनेकदा नेमके याच वेळी काहीतरी तांत्रिक बिघाड होतो आणि रेल्वे सेवा ठप्प होते. परिणामी नागरिकांना मनस्तापाशिवाय पर्यायच राहात नाही.